ऐतिहासिक एशियाटिक लायब्ररी इमारतीच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध.

by Prashant Kapadia/NHN
रु. ५६३.३३ लाखांच्या निधीतून १२ दुरुस्ती व संवर्धन कामांना गती;जुलै २०२६ अखेर पूर्णत्वाचे उद्दिष्ट.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना.
मुंबई, दि. 30 जून : राज्याच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक वारशाचा अमूल्य ठेवा असलेल्या एशियाटिक लायब्ररीच्या ऐतिहासिक इमारतीचे जतन, संवर्धन आणि आवश्यक दुरुस्तीची व्यापक कामे राज्य शासनामार्फत हाती घेण्यात आली आहेत. या कामांची आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी आ.अतुल भातखळकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामांची गुणवत्ता, ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप कायम राखणे आणि निर्धारित मुदतीत सर्व कामे पूर्ण करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी मंत्री श्री. भोसले म्हणाले की, “एशियाटिक लायब्ररी ही केवळ एक ग्रंथालयाची इमारत नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक इतिहासाचा अमूल्य वारसा आहे. अशा वारसा वास्तूंचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी असून, मूळ स्थापत्यशैली अबाधित ठेवत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.”
या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रु. ५६३.३३ लाखांचा प्रशासकीय निधी मंजूर करण्यात आला असून, एकूण १२ दुरुस्ती व संवर्धनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे इमारतीचे आयुष्य वाढण्यास मदत होणार असून, संशोधक, विद्यार्थी, वाचक आणि नागरिकांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. ही सर्व कामे जुलै २०२६ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सन १८३५ मध्ये उभारण्यात आलेली ही ऐतिहासिक वास्तू भारवाहक (Load Bearing Structure) प्रकारातील असून तळमजला अधिक एक मजला अशा स्वरूपाची आहे. सुमारे ३,७६५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या या इमारतीत ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, एशियाटिक सोसायटी, प्रधान मुद्रांक कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य महिला परिषद यांसारखी महत्त्वाची कार्यालये कार्यरत आहेत. ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या इमारतीच्या संवर्धनाला शासनाने विशेष प्राधान्य दिले आहे.
या प्रकल्पांतर्गत पहिल्या मजल्यावरील ग्रंथालय संचालनालय, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आणि एशियाटिक सोसायटीच्या कार्यालयांमध्ये गिलावा दुरुस्ती, रंगकाम, मेलामाईन पॉलिश, छताची दुरुस्ती, तसेच आवश्यक नागरी दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. इमारतीतील लाकडी दरवाजे, खिडक्या, कपाटे आणि इतर लाकडी भागांचे संवर्धन करून त्यांना पॉलिश करण्यात येणार असून, वास्तूचे मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपले जाणार आहे.
याशिवाय शौचालयांचे नूतनीकरण, कार्यालयांमध्ये जाळ्या बसविणे, कर्मचारी कक्षांची दुरुस्ती, व्हर्टिकल हॉल व जिन्यांमधील गिलावा आणि रंगकाम, आवश्यक त्या ठिकाणी भारत टाईल्स पद्धतीची फरशी बसविणे, तसेच इमारतीच्या विविध भागांतील संरचनात्मक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील मुख्य ग्रंथालय कक्ष, वाचन कक्ष, पुस्तक वितरण कक्ष, राजाराम मोहन रॉय कार्यालय, तसेच डॉ. पी. व्ही. काणे पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेच्या कक्षांची दुरुस्तीही या प्रकल्पात समाविष्ट आहे. तळघरातील ग्रंथसंग्रह सुरक्षित राहावा यासाठी आवश्यक दुरुस्ती, ओलावा नियंत्रण आणि संरचनात्मक मजबुतीकरणाची कामेही करण्यात येणार आहेत.
पाहणीदरम्यान मंत्री श्री. भोसले यांनी अधिकाऱ्यांना वारसा वास्तू संवर्धनाच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करून कामे करण्यात यावीत, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नये, तसेच नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल अशा पद्धतीने कामांचे नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
राज्य शासन ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण, जतन आणि संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, एशियाटिक लायब्ररीसारख्या जागतिक स्तरावरील ऐतिहासिक वारसा वास्तूचे जतन करून पुढील पिढ्यांसाठी हा अमूल्य ठेवा सुरक्षित ठेवण्यास शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.