loading...

एअर इंडिया इमारतीचे नूतनीकरण, नवीन प्रशासकीय इमारत व मनोरा आमदार निवासाची कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

by Prashant Kapadia/NHN

मुंबई | दि. १५ ऑक्टोबर २०२६: राज्यातील शासकीय इमारतींच्या बांधकाम व नूतनीकरणाची कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासोबतच रस्ते विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज मुंबईतील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी एअर इंडिया इमारतीचे नूतनीकरण, मंत्रालय परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचे काम तसेच उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासकामांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांचा दर्जा, प्रगती आणि पुढील नियोजनाचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

एअर इंडिया इमारतीच्या नूतनीकरणाचा आढावा

मुंबईतील नरिमन पॉईंट येथील राज्य शासनाच्या ताब्यातील एअर इंडिया इमारतीच्या नूतनीकरणासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयोजित बैठकीत स्थापत्य व विद्युत कामांची सद्यस्थिती, प्रशासकीय कार्यवाही आणि पुढील नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

राज्य शासनाने या इमारतीचा ताबा घेतल्यानंतर इमारतीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. इमारतीतील स्थापत्य व विद्युत कामांसाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, संबंधित कामांचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे.

इमारतीच्या वास्तुविशारद आणि विद्युत सल्लागार नियुक्तीसंदर्भातील कार्यवाहीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. इमारतीवरील जुना एअर इंडियाचा लोगो काढण्याचे काम पूर्ण झाले असून, नवीन लोगोच्या डिझाइनचे काम सर जे. जे. कला संचालनालयामार्फत सुरू आहे. विद्युत कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला असून, संबंधित कामांच्या निविदा प्रक्रियेची सद्यस्थितीही जाणून घेण्यात आली.

इमारतीच्या नूतनीकरणाशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करून पुढील कामांना गती द्यावी. स्थापत्य व विद्युत कामांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देत आवश्यक समन्वय साधावा आणि कामांच्या प्रत्येक टप्प्याचा नियमित आढावा घ्यावा, अशा सूचना मंत्री श्री. भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

नवीन प्रशासकीय इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

मंत्रालय परिसरातील गार्डन गेटजवळ उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून मंत्री श्री. भोसले यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

या इमारतीमध्ये विविध शासकीय कार्यालये, मुख्यमंत्री यांच्यासाठी प्रवेश लॉबी, उपाहारगृह, व्हीआयपी कक्ष, स्वागत कक्ष, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, विकसित महाराष्ट्र कक्ष तसेच विविध विभागांसाठी कार्यालयीन जागा उपलब्ध होणार आहेत.

इमारतीच्या संरचनात्मक कामांचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, बाह्य दर्शनी भागाचे काम पूर्ण झाले आहे. एसीपी क्लॅडिंग, स्पायडर ग्लेझिंग आणि इतर बाह्य सजावटीची कामे प्रगतिपथावर आहेत. फ्लोअरिंगचे काम बहुतांश पूर्ण झाले असून, उर्वरित मजल्यांवरील पार्टीशन, विद्युत व्यवस्था आणि इतर संबंधित कामे सुरू आहेत.

कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना उर्वरित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीमध्ये वाढ करावी, कामाचा वेग वाढवावा आणि विविध कामांमध्ये योग्य समन्वय राखावा, असे निर्देश मंत्री श्री. भोसले यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले.

शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना बांधकामाचा दर्जा, सुरक्षितता आणि कामांची गुणवत्ता यांना प्राधान्य द्यावे. कामात अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घेऊन नियमितपणे प्रगतीचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनोरा आमदार निवासाच्या कामांचा आढावा

मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामाची पाहणी करून मंत्री श्री. भोसले यांनी बांधकामाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी फ्लॅटची गुणवत्ता, फ्लोअरिंग तसेच सुरू असलेल्या विविध कामांची तपासणी करण्यात आली.

मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणी प्रकल्पामध्ये आधुनिक सुविधांनी युक्त आणि पर्यावरणपूरक इमारती उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामध्ये दोन्ही टॉवर आणि इतर इमारत क्षेत्रातील बांधकामाचा समावेश आहे. प्रकल्पाला ग्रीन बिल्डिंग मानांकन मिळवून देण्याच्या दृष्टीनेही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

सद्यस्थितीत टॉवर एच्या पायाभूत बांधकामाचे काम पूर्ण झाले असून, बहुतांश मजल्यांवरील स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. टॉवर बीच्या बांधकामानेही महत्त्वाचा टप्पा गाठला असून, उर्वरित स्लॅबचे काम प्रगतिपथावर आहे. दोन्ही टॉवरमधील अंतर्गत बांधकाम, फ्लोअरिंग, प्लंबिंग, विद्युत व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा आणि अग्निसुरक्षेशी संबंधित कामे सुरू आहेत. इतर इमारत क्षेत्रातील बांधकाम व अंतर्गत कामेही प्रगतिपथावर आहेत.

मनोरा आमदार निवासाच्या बांधकामाचा दर्जा उच्च राखून सर्व कामे नियोजनानुसार पूर्ण करावीत. फ्लोअरिंग, अंतर्गत सजावट, विद्युत व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांची कामे निर्धारित मानकांनुसार पूर्ण करून प्रकल्पाच्या प्रगतीला गती द्यावी. तसेच सुरू असलेल्या कामांचा नियमित आढावा घेऊन उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मंत्री श्री. भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

उमरखेड-महागाव मतदारसंघातील रस्ते विकासकामांचा आढावा

उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासकामांच्या अनुषंगाने आमदार श्री. किसन वानखेडे यांच्यासमवेत बैठक घेऊन विविध रस्त्यांच्या सुधारणा व रुंदीकरणाच्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेड तालुक्यांमधील उमरखेड–ढाणकी–कारली राज्य मार्ग तसेच विदुळ–चालगणी–साखरा–खारूस–देवसरी ते जिल्हा हद्द या प्रमुख जिल्हा मार्गावरील विकासकामांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

या रस्त्यांवरील वाढती वाहतूक, रस्ते सुरक्षेची आवश्यकता आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन रस्त्यांचे उन्नतीकरण व रुंदीकरण, सिमेंट काँक्रीट रस्त्यांची उभारणी, पक्क्या नाल्यांची निर्मिती, बस थांबे व बस-बेची उभारणी, तसेच आवश्यक ठिकाणी मोठ्या व लहान पुलांची आणि मोऱ्यांची पुनर्बांधणी यांसारख्या अतिरिक्त कामांबाबत चर्चा करण्यात आली.

सध्या मंजूर असलेल्या कामांच्या व्याप्तीत आवश्यकतेनुसार बदल करून अतिरिक्त कामांचा समावेश एचएएम-३ अंतर्गत करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना मंत्री श्री. भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार श्री. किसन वानखेडे यांच्याशी चर्चा करून मतदारसंघातील रस्त्यांच्या गरजेनुसार पुढील कार्यवाही करण्यावरही यावेळी भर देण्यात आला.

ग्रामीण भागातील रस्ते अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सुकर करण्यासोबतच नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

गुणवत्तापूर्ण कामे आणि वेळेचे काटेकोर नियोजन यावर भर

मुंबईतील शासकीय इमारतींचे बांधकाम व नूतनीकरण आणि राज्यातील रस्ते विकासकामे ही नागरिकांना अधिक सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पाचे नियोजन, कामांचा दर्जा आणि प्रत्यक्ष प्रगती यांचा नियमित आढावा घेऊन कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून कामातील अडचणी तातडीने दूर कराव्यात आणि दर्जेदार पायाभूत सुविधांची निर्मिती करावी, अशा सूचना मंत्री श्री. भोसले यांनी यावेळी दिल्या.

एअर इंडिया इमारत व नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामांच्या आढावा बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव श्री. मिलिंद म्हैसकर, सचिव (रस्ते) श्री. शरद राजभोज, सचिव (बांधकाम) श्री. आबासाहेब नागरगोजे, मुंबईच्या मुख्य अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उमरखेड-महागाव मतदारसंघातील रस्ते विकासकामांच्या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) श्री. शरद राजभोज, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे (MSIDC) मुख्य अभियंता श्री. रणजी हांडे, मुख्य अभियंता श्री. विशाल जवंजाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव श्री. शैलेंद्र बोरसे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *